पुणे: शिवाजीनगर भागात पाच लाखांचा गुटखा जप्त

पुणे, ११/१२/२०२२: शिवाजीनगर परिसरात गुटखा वाहतूक करणाऱ्या एकास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून दोन मोटारी, गुटखा असा १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संजय हनुमंत ओरसे (वय ३५), विनोद जयवंत ढोले (वय ३९, दोघे रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बंदी घातलेल्या गुटख्याची दोन मोटारीतून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातील रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. गुटखा वाहतूक करणाऱ्या मोटारचालक ओरसे आणि ढोले यांना ताब्यात घेण्यात आले. मोटारीची पाहणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत गुटखा भरलेल्या गोणी आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही मोटारींतून पाच लाखांचा गुटखा जप्त केला.

पोलीस उपायुक्त सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अजय पाटील, विकास जाधव, हवालदार संजय भापकर, प्रवीण ढमाळ, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.