पुणे: उच्चशिक्षित दाम्पत्याकडून सात जणांची ३२ कोटींची फसवणूक, २७० टक्के परताव्याचे दिले होते आमिष

पुणे, दि. २७ मे २०२१: शहरातील वेल्थ प्लॅनेट लि. (ब्रिटन) कंपनीने पुण्यातील बड्या व्यावसायिकांसह सातज णांची तबल ३२ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीसह(सीईओ) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ऑक्टोबर २०१८ पासून सुरू होता. याप्रकरणी हेमंत गुजराथी (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कंपनीचा सीईओ अभिजीत संजय कुलकर्णी, त्याची पत्नी, अनिकेत कुलकर्णी, नितीन पाष्टे आणि अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत हा संबंधित कंपनीचा सीईओ असून पत्नी टीम लीडर आहे. नितीन पाष्टे हा ओव्हरसिज सपोर्ट हेड आहे. हेमंत गुजराथी यांची चाकण भागात कंपनी आहे. आरोपीने हेमंत यांना संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास २७० टक्के परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार त्यांनी २ कोटी रुपये भरले. मात्र, त्यांना मुद्दल ठेव तसेच त्याचा परतावा ५ कोटी ६६ लाख आणि नुकसान भरपाई ४ कोटी ७५ लाख ४४ हजार रुपये असे एकूण १२ कोटी ४१ लाख ४४ हजार रुपये परत न करता आरोपींनी त्यांची फसवणूक केली आहे. त्याशिवाय आणखी ६ जणांना अशाच प्रकारे पैसे भरण्यास भाग पाडून आरोपींंनी १९ कोटी ५१ लाख रुपये न देता फसवणूक केली आहे. दोन वर्षे आरोपींनी पैसे देतो म्हणून फक्त टाळाटाळ केली.

या प्रकारणातील आरोपी अभिजीत संगणक अभियंता होता. त्याने नोकरी सोडून ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला. त्याने स्वत:ची यूके बेस्ड कंपनी सुरू केली. यानंतर त्याने व्यावसायिकांशी संपर्क साधत जादा परताव्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हेमंत गुजराथी यांनी गुंतवणूक केल्यावर त्याचा चांगला परतावा मिळाला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन कोटी रुपये गुंतवले होते. त्याशिवाय त्यांच्या इतर मित्रांनाही कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानंतर मात्र अभिजितने ‘सध्या मार्केट टाइट आहे, एवढा परतावा देता येणार नाही, थोडे थांबावे लागेल’ असा बहाणा करत चालढकल केली. अभिजीतवर अगोदरही एक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.