सराईतांकडून दोन तरूणावर  पालघनने वार

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी)-   इमारतीवर दगड मारल्याच्या रागातून तिघा सराईतांसह टोळक्याने तरूणावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर संबंधिताला रूग्णालयात दाखल केल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी पुन्हा मदत  करणाऱ्यावर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. यश वाल्मिकी (वय १९, रा. रामटेकडी)  आणि साहिल नहार अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी टोळक्यांविरूद्ध वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी यश वाल्मिकी रामटेकडीत राहायला असून डीमार्टमध्ये कामाला आहे. दोन दिवसांपुर्वी परिसरातील प्रथमा सोसायटीवर दगड मारल्याच्या रागातून टोळक्याने कामावरून घरी जाणाऱ्या यशला अडविले. तुला जास्त मस्ती आली आहे का, आमच्या इमारतीवर दगड का मारले, असे विचारून टोळक्याने पालघनने  वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर यशला उपचार करण्यासाठी  त्याचा मित्र साहिल नहार ससून रूग्णालयात घेउन गेला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटावडे यांनी दिली आहे.