October 21, 2025

पूना हॉस्पिटलवर मृतदेह रोखल्याचा आरोप; वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंचाची पुणे महानगरपालिकेकडे तक्रार

पुणे, २५ एप्रिल २०२५: शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ घेत असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर पूना हॉस्पिटलने अमानवीय व बेकायदेशीर वागणूक केल्याचा आरोप वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंचाने केला आहे. यासंदर्भात मंचाने पुणे महानगरपालिकेकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महेश पाठक यांचे २४ एप्रिल रोजी निधन झाले. मृत्यूनंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह तब्बल आठ तासांहून अधिक काळ ताब्यात ठेवला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली असता, रुग्णालयाने सकाळपर्यंत बिलिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह देण्यास नकार दिला. एवढ्यावरच न थांबता, बिलाची संपूर्ण रक्कम त्वरित भरण्याची मागणी करत मृतदेह देण्याची अट घातल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंचाने हा प्रकार अन्यायकारक, अमानवीय व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टच्या तरतुदीनुसार कोणत्याही परिस्थितीत मृतदेह रोखता येत नाही, याकडेही मंचाने लक्ष वेधले आहे.

याप्रकरणी मंचाने महापालिकेडे पुढील ठोस मागण्या केल्या आहेत:
-पूना हॉस्पिटलवर तातडीने कठोर कारवाई करणे
-जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे
-शहरी गरीब योजनेचा गैरवापर करणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द करणे
– महापालिकेकडून सार्वजनिक चौकशी करून अहवाल प्रसिद्ध करणे
– कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रार निवारण कक्षामार्फत सुनावणी घेणे

दरम्यान, जर महापालिकेने यावर त्वरीत कारवाई केनी नाही तर हा विषय उच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग व माध्यमांमध्ये नेण्यात येईल. असा इशारा देखील वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंचाने दिला आहे.
या तक्रारीवर महापालिकेकडून काय पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.