September 11, 2025

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ

पुणे, ११ सप्टेंबर २०२५ ः पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे १५% सामाजिक गृहनिर्माण आणि २०% सर्वसमावेशक योजनेतील ४१८६ सदनिका तसेच पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील म्हाडा गृहनिर्माण योजना व प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत १९८२ सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशा एकूण ६१६८ घरांसाठी ऑनलाईन सोडती व अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ आज मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुण्यातील म्हाडा कार्यालयात झाला.

सभापती पाटील म्हणाले, “सामाजिक गृहनिर्माण व सर्वसमावेशक योजनेत पुणे महापालिका क्षेत्रात १५३८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १५३४ आणि पीएमआरडीए क्षेत्रात १११४ अशी एकूण ४१८६ घरे उपलब्ध आहेत. तर म्हाडा योजनेंतर्गत १६८३ आणि पीएमएवाय अंतर्गत २९९ घरे मिळून एकूण ६१६८ सदनिका नागरिकांना उपलब्ध होतील. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.”

सोडतीसाठी नवीन सॉफ्टवेअर प्रणालीतील महत्त्वाचे मुद्दे:
उत्पन्न तपशील: विवाहित अर्जदाराने जोडीदाराचे उत्पन्न दाखवणे बंधनकारक; उत्पन्न नसल्यास ‘शून्य’ दाखवणे आवश्यक. पती-पत्नीने वेगवेगळे अर्ज केल्यास आणि त्यात विसंगती आढळल्यास अर्ज बाद होणार.
वैवाहिक स्थिती: घटस्फोटितांसाठी आदेशाची प्रत, विधवा/विधुरांसाठी मृत्यू दाखला अपलोड करणे आवश्यक.
संरक्षण दल / माजी सैनिक: स्वतंत्र प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
अधिवास प्रमाणपत्र: बारकोडसह केवळ २०१८ नंतरचे दाखले ग्राह्य धरले जातील.
क्यूआर कोड: वाटप आदेश, ताबापत्र, पावती आदी सर्व कागदपत्रांवर क्यूआर कोडची नोंद.
डिजीलॉकर अनिवार्य: अर्जदार व जोडीदाराचे आधारकार्ड व पॅनकार्ड फक्त डिजीलॉकरमधूनच स्वीकारले जाणार.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: घरांसाठी नोंदणी व अर्ज फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावी.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ घरे: यासाठी स्वतंत्रपणे म्हाडाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सभापती पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सदर संधीचा लाभ घेत अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. पारदर्शक प्रणालीमुळे प्रत्येक अर्जदारास न्याय मिळेल.”