पुणे, २७ मे २०२५: पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर राज्यभरात पुन्हा एकदा हुंडाबळी आणि लग्नसमारंभातील फाजील खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज मराठा समाजाच्या विविध संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमुखी ठराव करण्यात आला की, जर यापुढे कुणीही आमच्या लेकीवर अन्याय केला, हुंड्यासाठी त्रास दिला, तर संबंधित कुटुंबावर रोटी-बेटीचा व्यवहार कायमचा बंद केला जाईल.
बैठकीत शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समाजात लग्नप्रसंगी वाढत चाललेला दिखाऊपणा, अवाजवी खर्च आणि नव्याने उद्भवलेल्या चालीरीतींवर चिंता व्यक्त करण्यात आली. वैष्णवीसारखी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी कडक सामाजिक उपाययोजना करण्याचा निर्धार बैठकीतून करण्यात आला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, “आज झालेल्या बैठकीत समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र आल्या होत्या. चर्चेअंती ठराव करण्यात आला की, पुढे जर आमच्या लेकीवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय झाला तर त्या कुटुंबासोबत रोटी-बेटीचा संबंध ठेवला जाणार नाही. तसेच लग्न सोहळे अगदी साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात पार पडले पाहिजेत.”
शिंदे पुढे म्हणाले, “लग्न ठरलेल्या वेळेस लागले पाहिजे, जावयाचे मानपान, महागड्या भेटवस्तू, महालामध्ये लग्न, फोटोशूट, ही सगळी दिखावूपणाची परंपरा बंद झाली पाहिजे. ज्याला जे कार्यक्रम करायचे आहेत, त्यांनी आपापल्या घरातच करावेत. विवाह मात्र साधेपणाने व्हावा, हीच समाजाची भूमिका आहे.”
या वेळी माजी महापौर कमल व्यवहारे यांनीही वैष्णवी प्रकरणाबाबत तीव्र दुःख व्यक्त करत म्हटले, “ही घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे. लग्नाच्या नावाखाली होणारा फाजील खर्च, आणि हुंड्याच्या मागण्या थांबल्या पाहिजेत. समाजाने पुढाकार घेऊन साधेपणाने विवाह करण्याचा पायंडा पाडला पाहिजे.”
बैठकीत उपस्थित इतर मान्यवरांनीही पुढील काही महत्त्वाचे निर्णय घेतले:
– समाजातील नेत्यांनी स्वतः साधेपणाने लग्न केले पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिक त्याचे अनुकरण करतील.
– राजकीय व्यक्तींनी लग्नात भाषणबाजी न करता उपस्थित राहावे आणि भेटवस्तूंचा आग्रह टाळावा.
– नववधू व वर पक्षाने फक्त गरजेपुरताच खर्च करावा, प्रतिष्ठा दाखवण्यासाठी नव्या नव्या चाली लागू नयेत.
– या ठरावांमुळे वैष्णवीसारख्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार