पुणे, २/०६/२०२१: शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहेत, पण हे रस्ते शास्त्रीय पध्दतीने बजविले जात नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले तर त्याचा खर्च पथ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा अशी मागणी सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.
चार वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी निवृत्त सार्वजनिक बांधकाम सचिवांच्या अध्यक्षतेखाली महापालिका करत असलेली रस्त्यांची कामे शास्त्रशुध्द पध्दतीने होण्यासाठी नियमावली बनवण्यासाठी समिती बनवली होती. मी त्याचा एक सदस्य होतो. तत्कालीन महापालिका रस्ते विभाग प्रमुखांसह आम्ही सर्वांनी एक रूपयाही मानधन न घेता भरपूर वेळ खर्च करून ही नियमावली बनवली , मात्र आत्ता सुरु असलेली रस्त्यांची कामे बघता ही नियमावली रद्दीत घातली असावी असे वाटते. रस्ते खोदताना तिथे कामाची मुदत, कामाचे स्वरूप, कंत्राटदाराचे नाव यांसारख्या माहितीचा फलक असलाच पाहिजे हा नियम असो की रस्त्याच्या खणलेल्या भागाभोवती सुरक्षेच्या दृष्टीने बॅरीकेडस् लावण्याचा नियम असो ते नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले आहेत. वाहतुकीला कमीत कमी अडथळा यावा या दृष्टीने रस्ता खोदताना पूर्ण रस्ता एकदम न खोदता थोडा भाग खोदावा , तेथील काम पूर्ण करून तो रस्ता शास्त्रीय पध्दतीने दुरूस्ती करून मग पुढील काम सुरू करावे याचा तर पूर्णपणे विसर पडल्याने आज शहरभर खोदकामांमुळे वाहतुकीची दुर्दशा झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वळीव सुरु होतो हा अनेक वर्षांचा इतिहास असल्याने १५-२० मे पर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना यावेळी तो पर्यंत रस्ते खणण्याची कामेच सुरु होती. कामे करताना सुध्दा वाहतूक कोंडी होईल , लोकांना त्रास होईल याचा विचारही न करता शेजारच्या शेजारच्या रस्त्यांवर एकाच वेळी कामे सुरू करण्यात आली आणी ती अनेक दिवस रेंगाळली.
आता पाऊस सुरु झाल्याने या रस्ते खोदाई मुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे , अपघात होऊ लागले आहेत , त्यामुळे घाईघाईने अशास्त्रीय पध्दतीने रस्ते दुरुस्ती ची कामे करायला सुरुवात झाली आहे. आमच्या समितीने रस्ते दुरुस्ती करताना रस्ते दुरुस्ती नंतर त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेऊन कशी कामे करावीत याची जी नियमावली केली आहे त्याचे पालन झाले नाही तर परत पावसाळ्यात आज केली जाणारी रस्ते दुरुस्ती निकामी होऊन रस्ते शब्दशः खड्ड्यात जाण्याचा मोठा धोका आहे , मग त्यावेळी परत एकदा नागरीकांच्या करांचे पैसे खड्ड्यात घालून तात्पुरती मलमपट्टी करण्याची वेळ येईल.
आपणास विनंती आहे की आपण रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती ची कामे शास्त्रीय पध्दतीने करण्याचे आदेश द्यावेत व जर पावसाळ्यात ही कामे उखडली गेली तर तेंव्हा परत कराव्या लागणाऱ्या दुरूस्ती चा खर्च संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल असे नमूद करावे, असे वेलणकर यांनी सांगितले.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन