September 20, 2025

Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?

अनिल धनवटे
पुणे, १८ सप्टेंबर २०२५: सोमवारी पासून चालू असलेला संशोधक विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’ आंदोलन अजूनही चालूच आहे. अजून या मोर्चे बद्दल कोणीही दखल घ्यायला आलेलं नाही, राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे, असं विद्यार्थी म्हणत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (फेलोशिप) वेळेवर मिळत नसल्याने, विद्यार्थी कॅफे गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे आंदोलन करत आहेत.

आज दुपारी पासून पावसाने जोर धरलेला आहे , तरी संशोधक विद्यार्थी न डगमगता आंदोलना स्थळी ‘फेलोशिप आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या मालकाचं’ अशा घोषणा देत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात बऱ्याच मुली देखिल आहे, ते सुद्धा मुलांच्या बरोबरीने उभे आहेत. पावसाच्या सरींना न जुमानता त्यांनी आपली मागणी ठामपणे मांडत आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या
* सारथी, बार्टी आणि महाज्योती या सर्व संस्थांच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्यात
* नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती जाहीर करावी
* संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी
* शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी

या आंदोलनात राज्यभरातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. परभणी, राहुरी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी भागांतून विद्यार्थी पुण्यात दाखल झाले आहेत. आणि चारही विद्यापीठातील विद्यार्थी एकत्रित इथे जमलेले आहेत. तसेच आंदोलना स्थळी मुख्य आंदोलन दयानंद पवार हे अन्न- पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसलेले आहेत.

‘आम्ही सरकार पुढे दिड ते दोन वर्षांपासून आमच्या अडचणी मांडत आहेत, अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. आम्ही आमचं मत ठाम पणे मांडून देखिल राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे, तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय ? ‘ असं आव्हान आंदोलन कर्ते ओमकेश इखाणे आणि आकाश गलांडे यांनी केले.