पुणे, ०३/११/२०२२: बेकायदा सावकारी करणाऱ्या दाम्पत्यास खंडणी विराेधी पथकाने अटक केली. त्यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयराम निवृत्ती पोकळे (वय ४३) आणि त्याची पत्नी हेमा उर्फ रेखा (वय ३६, दोघे रा. धायरी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला धायरी भागात राहायला आहे. आरोपी पोकळे तिच्या ओळखीचे आहेत. महिलेने व्यवसायासाठी आरोपींकडून १५ टक्के व्याजाने सहा लाख ४५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर मे २०२२ पर्यंत महिलेने व्याजापोटी पोकळे यांना नऊ लाख ४५ हजार रुपये दिले. महिलेच्या मैत्रिणीने पोकळे यांच्याकडून साडेपाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने त्यांना व्याजापोटी सात लाख ३२ हजार रुपये परत केले.
त्यानंतर पोकळे यांनी समजुतीचा करारनामा करुन त्यांच्याकडून मुद्दल आणि व्याजापाेटी १८ लाख ८३ हजार रुपयांची मागणी केली. पैसे परत न केल्यास सदनिकेचा ताबा घेण्यात येईल, असे समजुतीच्या करारनाम्यात लिहून घेतले. महिला तसेच तिच्या मैत्रिणीला पोकळे यांना धमकावले. दंडापोटी पोकळे यांनी दोघींकडे २१ लाख ३९ हजार रुपये मागितले. सदनिकेचा ताबा घेण्यासाठी त्यांना धमकावले. अखेर महिलेने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन पोकळे दाम्पत्याला अटक केली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा