November 5, 2025

पुणे: सिंहगड किल्ला बंद राहण्याबाबत नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

पुणे, २ जून २०२५: सिंहगड किल्ल्यावर दिनांक २९ मे २०२५ पासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या वरील भागात कोणतेही वाहन पोहोचू शकत नसल्यामुळे सिमेंटची बांधकामे हाताने पाडावी लागत आहेत.

प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही वनविभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात यश आलेले आहे. केवळ काही प्रमाणात उर्वरित सिमेंट बांधकाम काढण्याचे काम प्रलंबित असून, ते देखील पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सर्व संबंधित यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहेत.

या पार्श्वभूमीवर दिनांक ३ व ४ जून २०२५ रोजी सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक, पर्यटक व ट्रेकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

सदर कालावधीत कृपया नागरिकांनी किल्ल्यावर येणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती पुणे वनविभागाने केली आहे.