पुणे: जुलै अखेर महापालिका मालामाल, तीन महिन्यात 1755 कोटींचे उत्पन्न

पुणे, २९/०६/२०२१: शहरात आर्थिक वर्षाचे पहिले अडीच महिने लॉकडाऊन असतानाही; महापालिका मालामाल झाली आहे. 1 एप्रील ते 25 जून अखेर पर्यंत पालिकेच्या तिजोरीत तब्बल 1555 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यात, सर्वाधिक 846 कोटींचे उत्पन्न एकटया मिळकतकरातून मिळाले असून 573 कोटींचे उत्पन्न स्थानिक संस्था करापोटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून जमा झाले आहेत.

दरम्यान, पहिल्या तीन महिन्यात मिळालेले उत्पन्न पाहता, महापालिकेच्या महसूल समितीने 2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल 6000 कोटींचे उत्पन्न मिळण्याचे नियोजन केले असून त्याबाबतचा आढावा समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि महसूल वाढ समितीच्या अध्यक्षा रूबल अग्रवाल यांनी दिली.

महापालिकेकडून महापालिकेच्या खर्चासह, महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेली जमा बाजू तसेच पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी महसूल वाढ समिती नेमण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने 2021-22 या आर्थिक वर्षाठी 8 हजार 370 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे, मात्र, प्रत्यक्षात गेल्या चार ते पाच वर्षात पालिकेस केवळ 4 हजार ते 4 हजार 500 च्या आसपासच उत्पन्नाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. परिणामी, प्रत्येक वर्षाचा जमा-खर्चाचा अंदाज चुकत असून महापालिकेची अंदाजपत्रकीय तूट 3 हजार कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे, या वर्षी अंदाजपत्रकात जमा खर्चाचा ताळमेळ सांभाळण्यासाठी या समितीकडून नियमित उत्पन्नाचा आढावा घेतला जात आहे.

6 हजार कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट: दरम्यान, या बैठकीत महापालिकेस चालू आर्थिक वर्षात मिळणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घेण्यात आला असून पालिकेस किमान 6 हजार कोटींचा महसूल मिळणे शक्‍य असल्याचे समोर आले आहे.त्याबाबत, सर्व विभागांना कशा प्रकारे उत्पन्न वाढविता येईल, त्यासाठी उर्वरीत महिन्यांमध्ये कसे नियोजन करणार, करोनाची स्थिती असतानाही कोणत्या स्वरूपात आणि कसे उत्पन्नवाढ करता येईल यावर चर्चा करण्यात आली असून सध्याचे तीन महिन्यात मिळालेले उत्पन्न पाहता हे उद्दीष्ठ निश्‍चित करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी स्पष्ट केले. त्यात, बांधकाम विभाग, पाणीपट्टी वसूली, अग्निशमनकर, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उत्पन्न हे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत ठरणार असून त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे.

तीन महिन्यात सर्वाधिक उत्पन्न असलेले प्रमुख विभाग

– स्थानिक संस्था कर – 573 कोटी

– कर आकारणी व संकलन – 846 कोटी

– बांधकाम विकास शुल्क – 278कोटी

– पाणी पुरवठा विभाग – 19 कोटी

– मालमत्ता व्यवस्थापन विभाग – 17 कोटी

– अग्निशमन विभाग – 14 कोटी

– पथ विभाग – 4 कोटी

– इतर – 4 कोटी

पुणे: अनधिकृत नळांसाठी महापालिकेची अभय योज़ना