इंडियन आयडॉल फायनलिस्ट आशिष कुलकर्णी याचे पुण्यात जोरदार स्वागत

पुणे, दि. ३० जून, २०२१ : इंडियन आयडॉल स्पर्धेतील अंतिम सात स्पर्धकांमध्ये एक असलेल्या पुण्यातील आशिष कुलकर्णी याचे आज शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. अंतिम फेरीपूर्वी आशिष हे आज एका दिवसासाठी पुण्यात आले होते.

पुण्याचे प्रथम नागरिक व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित आशिष कुलकर्णी राहत असलेल्या अरण्येश्वर भागातील ट्रेझर पार्क सोसायटीमध्ये सदर स्वागताचा कार्यक्रम पार पडला. आशिष यांच्या कुटुंबियांबरोबरच जयदीप माने, नगरसेवक महेश वाबळे, काका हलवाई स्वीट मार्टचे अविनाश गाडवे, लोकमान्य क्रेडीट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव यांबरोबर ट्रेझर पार्क सोसायटीमधील नागरिक या वेळी उपस्थित होते.

सुरुवातीला फुलांच्या पायघड्या घालून, फेटा बांधून औक्षण करीत आशिष यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोसायटीमध्ये आयोजित एक छोटेखानी कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेरी पगडी घालत व पेढा भरवित आशिष यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत आशिषचे कौतुक करताना आमच्यावर मर्यादा होत्या, मात्र जेव्हा आशिष इंडियन आयडॉलचा खिताब जिंकून येईल, तेव्हा पुणेकरांच्या वतीने आम्ही शनिवारवाड्यावर त्याच्या सत्काराचे आयोजन करू. आशिष हा उत्तम गायक असून ही स्पर्धा जिंकण्यासाठी पुणेकर त्याला मतांद्वारे निश्चितच साथ देतील असा विश्वास देखील त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ट्रेझर पार्क सोसायटी ही आजवर पूर व अनेक दुर्दैवी घटनांसाठी ओळखली जायची, आज आशिषच्या रूपाने आम्हाला नवी ओळख मिळाल्याचे मत नगरसेवक वाबळे यांनी व्यक्त केले. सोसायटीतील महिला वर्ग, लहान मुले सर्वच जण या वेळी आशिषला विजयी करण्यासाठी मतांचे आवाहन करताना पहायला मिळाले. सोसायटीच्या सर्व सुरक्षा रक्षकांनी देखील आशिषसाठी एकत्रित मते मागितली. या कार्यक्रमानंतर आशिष यांनी कुटुंबियांसोबत आपल्या आवडत्या रस मलाई, श्रीखंड या मिठाईबरोबरच जेवणाचा आस्वाद घेतला. माझ्या कुटुंबियांबरोबरच पुणेकरांचे मिळत असलेले हे प्रेम माझ्यासाठी आनंदाची बाब असून या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल, असा विश्वास या वेळी आशिष यांनी बोलून दाखविला. पुणेकरांनी मोठ्या संख्येने मते द्यावीत असे आवाहनही त्याने केले.