पुणे: पत्ता विचारण्याचा बहाण्याने पायी चालणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावणारी टोळी गजाआड; खडक पोलीसांकडून कारवाई 

पुणे, दि.११/०४/२०२२: टिळक रस्ता आणि राष्ट्रभूषण चौक येथे पहाटे रस्त्यावरून चालणाऱ्या दोन व्यक्तींचे मोबाईल हॅण्डसेट व रोख रक्‍कम असे एकुण १५,४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून, पळ काढल्याप्रकरणी नोंदविलेल्या गुन्ह्याची तपासणी करत असताना, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गोविंद मेंगे (रा. शनिवार पेठ) हे २९ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास टिळक रस्त्यावर चालत होते. तर त्याच दिवशी अभय बळीराम शिंदे (रा. घोरपडे पेठ) हे राष्ट्रभुषण चौक पुणे असे पायी चालत जात असतांना दोन दुचाकीवरील चार व्यक्तींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या दोन्ही व्यक्तींच्या खिशातील एक रियलमी व एमआय कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट व रोख रक्‍कम असे एकुण १५,४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून, पळ काढला. याबाबत खडक पोलीस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याची तपासणी करताना, संशयित आरोपींचा तांत्रिक बाबीच्या आधारे शोध घेत, जवळपास ७० ते ८० शासकीय व खाजगी सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी करण्यात आली. त्यावरून आरोपी हे जुनी सांगवी व दापोडी पुणे येथील असल्याचा ठावठिकाणा लागल्याने पोलीस अंमलदार संदीप तळेकर व हिंमत होळकर यांनी बातमीदारामार्फत बातमी काढुन, राहुल संजय सरोदे (वय १९ वर्षे, रा. एस.टी.कॉलनी, घर नं. ४५, जुनी सांगवी), सुमित भिम सुर्यवंशी (वय १९ वर्षे,रा. दापोडी, आत्तार वीटभट्टी, आबा काटे चाळ, अनाथ आश्रम जवळ), अंकित सुदाम भालेराव (वय २० वर्षे, रा. दापोडी, आत्तार वीट भट्टी, आबा काटे चाळ, अनाथ आश्रम जवळ) व एक अल्पवयीन मुलगा यांना त्यांच्याकडील एक लाल रंगाची स्टनर मोटर सायकल व एक लाल रंगाची होन्डा डीओ या गाडयांसह ताब्यात घेण्यात आले.

 

त्यांना खडक पोलीस ठाणे येथे आणून सखोल तपास केला असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून गुन्हयातील जबरदस्तीने हिसकाविलेला एक रिलयमी य एमआय कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम व गुन्हयात वापरलेल्या मोटर सायकली असा एकुण ६५,४५०/- रुपये किंमातीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींनी आणखी अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहे काय याबाबत तपास चालू आहे.

 

ही कारवाई ही परिमंडळ १ च्या पोलीस उप-आयुक्‍त डॉ. प्रियंका नारनवरे आणि फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे, पोलीस उप निरीक्षक राहुल खंडाळे व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे, हिंमत होळकर, रफिक नदाफ, राहुल मोरे, विशाल जाधव, सागर घाडगे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, महेश पवार यांच्या पथकाने केली आहे.