पुणे: नातलगाचा ऐवज चोरणारा चोरटा जेरबंद, खडक पोलिसांची कारवाई

पुणे, १०/१०/२०२२: लग्नासाठी जमविलेल्या पैसे घरफोडी करून चोरून नेणार्‍या चोरट्याांला खडक पोलिसांच्या पथकाने काही तासांच्या आत हैद्राबादला पळून जाण्याच्या पूर्वीच बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरी गेलेली दोन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

मोहम्मद तमीम कलीमउद्दीन चौधरी (18, रा. अंजुमन मस्जिद समोर लोहीयानगर पुणे मुळ रा. वल्लभभाई पटेलनगर, रोडा मिस्त्रीनगर, जि. रंगारेड्डी, हैद्राबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात आरिफ रौफ शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

आरिफ नोकरदार असून त्यांचे पुढील महिन्यातच लग्न आहे. याच लग्नासाठी त्यांची पैशाची जमवाजमव सुरू होती. त्यातून त्यांनी तब्बल दोन लाख रूपये आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 2 लाख 50 हजारांचा ऐवज जमा करून ठेवला होता. दि. 8 ऑक्टोबरच्या सायंकाळी पाच ते पावणे सहाच्या सुमारास संशयीत आरोपी मोहम्मद चौधरी हा आरिफ यांच्या घराची कडी उघडून घरात शिरला होता. तसेच त्याने लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घेऊन पोबारा केला होता. याबाबत आरिफ यांनी तत्काळ खडक पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता यादव, गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार केली. तांत्रिक माहितीच्या आधारे मोहम्मद याचा शोध सुरू होता.

पथकातील अमंलदार संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मोहम्मद हा लोहीयानगर गंजपेठेतील इनामके मळा येथे आल्याचे समजले. त्यानंतर तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव यांनी पथकासह तेथे गेले असता त्यांनी मोहम्मदला पकडले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने चोरी केलेला ऐवज पोलिसांच्या हवाली केला. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल बनकर, राहुल शिंगे, मंगेश गायकवाड, तुळशीराम टेंबुर्णे यांच्या पथकाने ह कारवाई केली.