पुणे: भांडणातून सवतीवर केला चाकू हल्ला, महिलेवर गुन्हा दाखल

पुणे, दि. २७ मे २०२१: – नाना पेठेत एकाच घरात राहणाऱ्या सवतींमध्ये झालेल्या वादातून एकीने दुसरीवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाजनीन सज्जाद (वय ३६, रा. नाना पेठ) यांच्याविरूद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीशा सज्जाद शेख (वय २७, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजनीन आणि अलिशा दोघेही सवत असून नाना पेठीतल ए. डी. कॅम्प चौक परिसरात एकाच घरात राहायला आहेत. त्यांच्यात घरगुती कारणावरून पूर्वी एकदा भांडण झाले होते. त्याचा राग नाजनीनच्या मनात होता. त्याच रागातून तिने २४ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिशाला शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, त्याचा नाजनीनला राग आला. तिने अलीशाच्या डाव्या हाताच्या पंजावर चाकू मारून तिला जखमी केले. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमचंद्र खोपडे तपास करीत आहेत.