पुणे: शहरातील हिंगणे खुर्द, बिबेववाडी परिसरात नागरिकांची लुटमार

पुणे, १६ जून २०२१- शहरातील विविध भागात नागरिकांसोबत लुटमारीचे सत्र कायम असून चोरट्यांनी हिंगणे खुर्द, बिबेववाडी, परिसरात जबरी चोरी केल्याचेप्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंगणे खुर्दमधील महादेव नगर परिसरात पार्टीसाठी पैसे पाहिजेत, असे म्हणत लुटमारांनी एका तरूणाच्या गळ्याला कोयता लावून खिशातील पैसे काढून घेतले आहेत. याप्रकरणी सागर ढेबे (रा. साईनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा छगन मरगळे (वय १९,रा. साईनगर) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महादेवनगर येथील एका स्वीट मार्टसमोर १३ जून रोजी दुपारी कृष्णा मित्रासोबत थांबला होता. त्यावेळी आरोपी सागर त्याठिकाणी आला. ‘ मला पार्टीला पानशेत येथे जायचे आहे, तुझ्याकडील सर्व पैसे दे, नाहीतर तुला मारून टाकील, अशी धमकी देत कोयता गळ्याला लावला. त्यावेळी कृष्णा याने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने दमबाजी करत तुला माहिती नाही, मी वडगावचा भाई आहे, असे म्हणत कोयता हातात फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या खिशातील २ हजार १०० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत. त्याशिवाय बिबवेवाडीतील यश लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकाला दुचाकीस्वार चोरट्यांनी अडवून दमदाटी करत त्यांच्याजवळील मोबाईल व जेवणाचा डबा हिसकावून घेतला. अविनिश निवृत्ती मोरडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.