पुणे, ११ डिसेंबर २०२५ : राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत असताना पुण्यात महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. भाजपकडून महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम दावा केला जात असला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाची तयारी सुरू केल्याने राजकीय समीकरणे तापू लागली आहेत.
पुणे महापालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप महायुतीतील तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक न झाल्याने स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी अधिक गती घेत आहे.
भाजपने उमेदवारी अर्जांचे वितरण सुरू केले असून, आतापर्यंत तब्बल दोन हजारांहून अधिक इच्छुकांनी फॉर्म घेतल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही फॉर्म वितरण सुरू केले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आजपासून १६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज वाटपास प्रारंभ केला आहे.
या संदर्भात भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट सांगितले आहे की महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढायची आहे. महायुतीबाबत प्रदेशस्तरीय निर्णय कायम असून आम्ही त्यानुसार तयारी करत आहोत. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. सध्या भाजपकडे १०२ नगरसेवक आहेत आणि १५ ते २० ठिकाणी आमचे उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले होते. शहरातील १२५ जागा आमच्या विजयाच्या दृष्टीने अनुकूल आहेत. महायुतीबाबत मित्रपक्षांकडून अजून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही. मात्र लवकरच एकत्र बसून चर्चा करू.”
राज्यस्तरावर महायुतीचे निर्णय प्रलंबित असताना पुण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी स्वबळावर लक्ष केंद्रीत केले आहे. तिन्ही पक्षांमध्ये एकत्रित चर्चा अद्याप झालेली नसल्याने स्थानिक स्तरावर स्वतंत्र रणनिती आखली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कोणता पक्ष कोणत्या पद्धतीने रिंगणात उतरणार, महायुती अखेर टिकणार की स्वबळावरची लढत आकार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

More Stories
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन