निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग करणार्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, २४/०७/२०२१: वायू दलातून सेवा निवृत्त झालेल्या अधिकार्याच्या पत्नीचा भोसरी पोलिस ठाण्याच्या बाहेर विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सदेश नायर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेचे पती वायू दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते सिक्युरिटी कंपनीत व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी नायर देखील या कंपनीत काम करत होता.

२०१८ मध्ये त्यांनी या कंपनीचा राजीनामा दिला. फिर्यादी यांच्या पतीवर भोसरी पोलिस ठाण्यात नुकताच फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात त्यांना पोलिस ठाण्यात चौकशी करण्यासाठी ६ जुलै रोजी त्यांना पोलिसांनी बोलावून घेतले होते.


फिर्यादी यांचे पती संध्याकाळ झाली तरी ते घरी आले नाहीत त्यामुळे त्यांच्या दोन मुलांसह त्या भोसरी पोलिस ठाण्यात पोहचल्या. त्यांचा मुलगा कार पार्क करत असताना
आरोपी नायर हा फियार्दी यांच्या जवळ आला. तु तुझा नवरा सोडून माझ्या सोबत एक रात्र चल, तुझ्या नवर्याला या प्रकारणातून बाहेर काढतो. मला तू खूप दिवसांपासून आवडतेस, तु माझ्या सोबत चल, या नवर्यात काय ठेवले आहे. तुला भरपूर पैसा देईन असे बोलून मनास लज्जा निर्माण केली. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर नायरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.