पुणे: रविवार पेठेतून १७ हजारांचा मांजा जप्त, सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे, दि. ०९/०१/२०२३: संक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजी करण्यासाठी प्रतिबंधित मांजाची विक्री करणार्‍या दुकानदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ९ जानेवारीला रविवार पेठेतील दुकानदाराविरूद्ध कारवाई करीत १७ हजारांचा मांजा जप्त केला आहे.

रविवार पेठ परिसरात प्रतिबंधित मांजा साठवणुक करुन विक्री केल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकला असता, त्याठिकाणी प्रतिबंधित २४ रील मांजा धागा आढळून आला. पथकाने १७ हजारांचा मांजा जप्त करीत आरोपी विरुध्द खडक पोलीस  ठाण्यात १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त  रितेश कुमार, सहआयुक्त  संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार , सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील,   अजय राणे, आण्णा माने, राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ,  पठाण, हनमंत कांबळे यांनी केली.

“प्रतिबंधित मांजा नायलॉन धाग्याची विक्री होत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवार पेठेतील दुकानावर छापा टाकून १७ हजार रूपये किंमतीच्या २४ रील मांजा जप्त केला आहे.” –
विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग