पुणे: अल्पवयीन मुलीसोबत केले लग्न, कारागृहातुन सुटल्यानंतर कौटुंबिक वादातून केला खून

पुणे , 28 ऑक्टोबर 2022: अल्पवयीन मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानंतर मद्यपान केल्यानंतर कौटुंबिक वादातून पतीने तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. याप्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

संजना उदय मकदूम (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. संजनाची आई सुवर्णा यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चेतनला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चेतन आणि संजना यांची ओळख होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नोव्हेंबर २०१८ रोजी पळवून नेले होते. याबाबत संजनाच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालायाने चेतनला नुकताच जामीन मंजूर केला होता. त्यानंतर चेतनने संजनाला पुन्हा पळवून नेत तिच्यासोबत लग्न केले . काही दिवसांपासून दोघेही लोहगावमधील निंबाळकरनगर परिसरात राहत होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाल्याने चेतनने संजनाचा छळ सुरू केला. मद्यपान करून त्याने संजनाला बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, सहायक पोलीस निरीक्षक एस एन लहाणे सहायक पोलीस निरीक्षक रत्ना सपकाळे, पोलीस अमलदार सचिन जाधव यांनी केली.