पुणे: मिशन ऑलिम्पिक मेडल’साठी महापौरांच्या खेळाडूंना शुभेच्छा

पुणे, २३/०६/२०२१: टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसाठी भारतीय संघात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी पुण्यात सराव केला. त्यांच्यासह राज्याचे आठ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी (दि. २३) ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने या खेळाडूंना ‘मिशन ऑलिम्पिक मेडल’साठी शुभेच्छा दिल्या.

ध्रुवतारा फाऊंडेशन आणि आर्चर्स अकॅडमी यांच्या वतीने बाबुराव सणस मैदानावरील क्रीडा गॅलरीत ऑलिम्पिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मोहोळ यांच्यासह शहर भाजपा उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे, महापालिका क्रीडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी नगरसेवक राजाभाऊ शेंडगे, ऑलिम्पियन मनोज पिंगळे, पॅरालिम्पिक खेळाडू सुयश जाधव, भारताला १९३६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी सुवर्ण जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडू बाबू निमल यांचे पुत्र अजित निमल, देशातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल खाशाबा जाधव (१९५२, हेलसिंकी ऑलिम्पिक) यांचे पुत्र रणजीत जाधव, ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधाणे, भारताचे आर्चरी प्रशिक्षक प्रा. रणजीत चामले आदी मान्यवर उपस्थित होते.

देशासाठी खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पहिले वैयक्तिक पदक आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या संघाने जिंकलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ऑलिम्पिक सुवर्णपदक तसेच मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेला पॅरालिम्पिकपटू सुयश जाधव, माजी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

पुण्यात क्रीडाक्षेत्राची वैभवशाली परंपरा असून देशाला अनेक खेळाडू पुण्याने दिले असल्याचा उल्लेख करून महापौर म्हणाले, ऑलिम्पिक पदकविजेत्यांचे स्मरण तसेच नव्या ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा हा सुंदर संयोग ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने जुळून आला आहे. यातून नव्या खेळाडूंना उमेद मिळणार आहे. “देशातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव यांना पद्मश्री मिळायला हवा होता. पण त्यांना तो अद्याप मिळालेला नाही,” अशी खंत महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी रणजीत जाधव, सुयश जाधव, मनोज पिंगळे, राजाभाऊ शेंडगे, श्रीपाद ढेकणे यांची मनागते झाली. ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व व भारताची ऑलिम्पिक यशोगाथा या विषयावर लेखक संजय दुधाणे विचार मांडले. कार्यक्रमाच्या अखेरीस टोकिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्सा मराठमोळ्या खेळाडूंना पुणेकराच्या वतीने बॅनरवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवरांनी स्वाक्षरीव्दारे शुभेच्छा देत ‘चक देत इंडिया’चा जयघोष केला.