पुणे: कुविख्यात गुन्हेगाराकडून एक कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुणे, २९/०७/२०२२: विमाननगरमधील एका नामांकित महाविद्यालयाजवळ कुविख्यात गुन्हेगारावर कारवाई करून पोलीसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.

विमानतळ पोलीसांनी त्याच्याकडून एमडी अमली पदार्थ जप्त केले आहे.

अरविंद रविंद्र बिर्हाडे (वय ३६, रा. अमळनेर. जि. जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद हा जळगावमधील गुन्हेगार असून, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, विमानतळ पोलीस ठाण्यातील अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजन येथील महाविद्यालयाजवळ उभा असून, त्याच्याकडे अमली पदार्थ आहे.

त्यानूसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी करत झडती घेतल्यानंतर १ कोटी ७ लाख रुपयांचा एम.डी. हा अमली पदार्थ मिळून आला. त्याला अटककरत आता त्याच्याकडे चौकशी केली जात असून, तो हा अमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता तसेच तो कोठून आणला गेला, याची माहिती घेतली जात आहे.