November 15, 2025

Pune: एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन

पुणे, दि, १४ नोव्हेंबर २०२५ : मराठा उद्योजक संघटना अर्थात एमईएच्या वतीने २७ ,२८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६ रोजी पुण्यातील कृषी मैदानावर एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले असल्याची औपचारिक घोषणा मराठा उद्योजक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केली. आज गोपाळ – गणेश कॉम्प्लेक्स, आगरकर रस्ता येथे असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या सभागृहात सदर पत्रकार परिषद संपन्न झाली, त्यावेळी गायकवाड बोलत होते. सदर बिझनेस एक्स्पो अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची औपचारिक घोषणा देखील यावेळी प्रसिद्ध उद्योजक आणि क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली.

एमईएचे माजी अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कु-हाडे, सई बहिरट पाटील. नितीन भोसले, सागर तुपे, महेश भागवत, विजय गवारे, तेजस चारवाड, आश्रम काळे. अनिकेत हेलुडे, सायली काळे आदी मान्यवर देखील या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.

सदर एक्स्पोच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना विक्रम गायकवाड म्हणाले की, “मराठा समाजात उद्योजकता वाढीस लागावी, या समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्राविषयी योग्य व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने मागील १४ वर्षांपासून मराठा ऑन्ट्रप्रेन्यूअर असोसिएशन अर्थात मराठा उद्योजक संघटना कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.”

मराठा समुदायाला एक उद्योजक समुदाय म्हणून पुढे नेत असताना या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात परदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक आणि व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले.

या एक्स्पोमध्ये बांधकाम व्यवसाय, उत्पादन, आयटी, एफएमसीजी, कृषी-तंत्रज्ञान, जीवनशैली, शिक्षण, आदरातिथ्य, सेवा, आयात-निर्यात, ऑटोमोबाईल, आरोग्य व कल्याण, बँकिंग आणि वित्त यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश असणार असून या क्षेत्राशी संबंधित ५०० हून अधिक स्टॉल्स देखील याठिकाणी असतील अशी माहिती गायकवाड यांनी दिली. आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था, सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि उद्योग विषयक तज्ज्ञ यांची उपस्थिती देखील या एक्स्पोचे वैशिष्ट्य असेल, असेही गायकवाड म्हणाले.

एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ हे उद्योजकांच्या त्यांच्या व्यावसायिक वृद्धीत आवश्यक ती मदत करणारे, त्यांना वेळोवेळी सक्षम करणारे, त्यांना सहकार्य करणारे व्यासपीठ असून याद्वारे देश- विदेशातील हजारो गुंतवणूकदारांना, उद्योजकांना व धोरणकर्त्यांना भेटण्याची संधी सहभागी होणाऱ्या उद्योजकांना मिळेल याशिवाय अर्थपूर्ण भागीदारी व टाय अप करीत व्यवसाय वाढविण्याची, उद्योजकांना आपला ब्रँड जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची, नवीन बाजारपेठा व गुंतवणूक संधींमध्ये प्रवेश करण्याची, तज्ज्ञ आणि आघाडीच्या नेतृत्त्वकडून ज्ञान व उद्योग विषयक अनेक बारकावे समजून घेण्याची संधी उपलब्ध होईल असेही गायकवाड यांनी संगितले.

एमईए विषयी अधिक माहिती –

मराठा उद्योजक संघटना (एमईए) यांच्या वतीने मराठा समुदायाचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी १५ वर्षांहून अधिक काळ सक्रियपणे काम सुरु आहे. एमईएने २००० हून अधिक उद्योजकांच्या सदस्यत्वाच्या आधारासह आणि २०० हून अधिक यशस्वी व्यावसायिक कार्यक्रमांच्या ट्रॅक रेकॉर्डसह उद्योजकता, सहकार्य आणि समुदाय उन्नतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक स्वावलंबी, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मराठा व्यवसाय समुदाय निर्माण करणे हे संघटनेचे ध्येय असून त्याद्वारे व्यवसाय उत्कृष्टतेला प्रेरणा देणे, विश्वास निर्माण करणे आणि शाश्वत वाढ अधिक सक्षम करणे यासाठी ते कार्यरत आहेत.

एमईए आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रदर्शन २०२६ हे केवळ एक प्रदर्शन नसून ती मराठा समाजासाठी उभारलेली एक प्रगतीशील चळवळ आहे. याद्वारे मराठा उद्योजकांना एकत्र येण्याचे, त्यांच्यासाठी नव्या उद्योजक संधी शोधण्याचे आणि समुदायाच्या आर्थिक ताकदीचे भविष्य घडवण्याचे काम करण्यात येते.