पुणे: मॅकेनिकल इंजिनिअरला १५ लाखांचा गंडा

पुणे, २० जुलै २०२१:- आभासी चलनाच्या व्यवहारातून पाचजणांनी मॅकेनिकल इंजिनिअरला रोख तीन लाखांसह १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना डिसेंबर २०१७ ते जुलै २०२१ कालावधीत बालाजी मार्केट परिसरात घडली आहे. याप्रकरणी धीरज जगदाळे (वय ४८, रा. डीएसके, धायरी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हे मॅकेनिकल इंजिनिअर असून सिव्हील व्यवसायात कार्यरत आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांची एकासोबत ओळख झाली होती. ओळखीतून आरोपीने त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर मोनेश क्लासिक नावाचे आभासी चलन बनविल्याचे सांगत रोख तीन लाख रूपये घेतले. मात्र, त्याचा काहाही फायदा धीरज यांना झाला नाही. त्यानंतर आरोपींनी धीरज यांना बीट कॉईन वॉलेट आणि इथोरिअम अ‍ॅड्सवर वेळोवेळी रक्कम पाठविण्यास सांगून १५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत.