September 12, 2025

पुणे: वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या; सशस्त्र सेना महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

पुणे, १२ मे २०२५: सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) हॉस्टेलच्या बाथरूममध्ये एका २० वर्षीय मृतदेह सापडला आहे. मृत विद्यार्थी उत्कर्ष महादेव शिंगणे (रा. भाग्यनगर, बीड) हा सध्या एआयआयएमएस भोपाळ येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो एएफएमसी महाविद्यालयात ८ मे रोजी सुरू असलेल्या एका कार्यक्रमासाठी आला होता आणि कार्यक्रमानंतर कॉलेजमध्येच थांबला होता.

११ मे रोजी सकाळपासून त्याचा फोन बंद येत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, उत्कर्षने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सुसाईड नोट पाठवली होती. त्यानंतर एएफएमसी प्रशासनाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली. शोध घेत असताना बॉईज हॉस्टेलमधील एका स्वच्छतागृहामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. तो कमोडवर बसलेल्या अवस्थेत आढळला असून बाजूला रक्त साचलेले होते आणि एक धारधार चाकूही सापडला. त्याचे साहित्यही बाथरूममध्ये पाठीमागे ठेवलेले होते. प्रथमदर्शनी आत्महत्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

एएफएमसी च्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर उत्कर्षचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, उत्कर्ष गेल्या वर्षभरापासून अभ्यासातील ताणामुळे डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर भोपाळ येथील एआयआयएमएसमध्ये उपचार सुरू होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून चाकू खरेदी केला होता व त्या चाकूने स्वतःच्या छातीत वार करून आत्महत्या केली. त्याने व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरही सुसाईड नोट ठेवली होती.

या घटनेत सध्या कोणताही संशयित गुन्हेगारी हेतू आढळून आलेला नसून, वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.