पुणे मेट्रोने गरवारे मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे मेट्रोची चाचणी घेतली

पुणे, 25 नोव्हेंबर 2022: आज दिनांक २५/११/२०२२ रोजी पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे मेट्रो ट्रेनची चाचणी घेतली. दुपारी २.३० वाजता मेट्रो ट्रेन गरवारे स्थाकातून सुटली. डेक्कन स्थानक, छत्रपती संभाजी उद्यान स्थानक, पुणे महानगरपालिका स्थानक पार करून ३.१० वाजता सिव्हिल कोर्ट येथील उन्नत स्थाकात पोहचली. या पूर्ण मार्गाची लांबी २.७४ किमी आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकात आल्यावर मेट्रो कर्मचाऱ्यांनी ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले. या चाचणीसाठी ट्रॅक विभाग, व्हायाडक्ट विभाग, मेट्रो स्थानक विभाग, ट्रॅकशन विभाग, सिग्नल विभाग, टेलिकॉम विभाग, रोलिंग स्टॉक विभाग अहोरात्र सतत काम करत होते. आज झालेली चाचणी नियोजित वेळेनुसार आणि नियोजित उद्दिष्टांनुसार पार पडली. येत्या काही दिवसांत आजून चाचण्या घेण्यात येऊन सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात येईल.

गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या चाचणीनंतर अश्या प्रकारची चाचणी फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक येथे लवकरच घेण्यात येईल. या दोन्ही भागांमध्ये पुणे मेट्रोच्या स्थानकांचे काम वेगाने सुरु आहे. हि कामे पूर्ण झाल्यावर CMRS यांचे परीक्षण होईल. CMRS यांच्या निरीक्षणांची पूर्तता केल्यावर प्रवाश्यांसाठी हे मार्ग खुले करता येतील.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, “गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक येथे आज घेण्यात आलेली चाचणी अत्यंत्य महत्वपूर्ण टप्पा आहे. सिव्हिल कोर्ट स्थानक हे दोन्ही मार्गिकांना जोडणारे इंटरचेंज स्थानक आहे. लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हि चाचणी घेण्यात येईल आणि हे मार्ग येत्या काही महिन्यात प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येतील.”