September 11, 2025

पुणे: मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, १२ जुलै २०२५: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार असून, देशातील सर्वात लांब बोगदा आणि सर्वात उंच पूल याच प्रकल्पात उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, तसेच राज्य आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे घाटमार्ग टाळता येणार असून, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक सुकर व आरामदायी ठरेल.

प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून, त्यातील एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंद आहे. हा बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार असून, याआधी समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम मागे पडणार आहे. याशिवाय, १८५ मीटर उंचीचा पूल बांधण्यात येत असून, हा देशातील सर्वात उंच पूल ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या अभियंते आणि कामगारांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्प हे आधुनिक तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कठीण भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत अभियंते अविरत मेहनत करत आहेत. प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होईल, वाहतुकीची समस्या सुटेल, इंधन बचत आणि प्रदूषणात घट होईल. महाराष्ट्राच्या विकासात या प्रकल्पाचा मोलाचा वाटा असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती दिली.