पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची फसवणूक, आईच्या उपचाराच्या नावाखाली फसवणूक

पुणे, १९/०७/२०२२: आईला रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून एकाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशांची गरज असल्याचे सांगितले. मिसळ यांना ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पूजा मिसाळ यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी प्राथमिक तपास केला असता आरोपींनी ४ महिला आमदारांशी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.