पुणे : शहरात हॉटेलची वेळ रात्री वाढविण्यासाठी तसेच जिम व्यवसायाला निर्बंधातून सूट देण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे, २६/७/२०२१:- डबघाईला आलेल्या हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी हॉटेलचालकांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत पूर्णपणे व्यवसाय करण्याची मुभा द्यावी,अशा मागणीचे पत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी(दि.२६) पाठवले आहे.

सध्या हॉटेल व्यवसायाला दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे. चार नंतर फक्त पार्सल सर्व्हिस देण्याचे बंधन आहे. पण, पार्सल सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. गेले वर्ष, सव्वावर्ष वेगवेगळे निर्बंध, कोविडच्या भितीने कामगारांनी त्यांच्या गावी केलेले स्थलांतर अशा कारणांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, बार मालक व्यवसाय चालवताना मेटाकुटीला आले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात कोल्हापूर, कोकण भागात महापूर आला. दूध, भाजीपाला याची वाहतूक थंडावली. त्याकारणाने या वस्तूंचे दरही वाढले. त्याचाही फटका हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे. या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हॉटेल व्यवसायाची वेळ रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाढवून मिळावी. यासाठी कोविड संदर्भातील सर्व नियम पाळण्याची हॉटेल व्यवसायिकांची तयारी आहे, असे शिरोळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

निर्बंधांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील जिम उद्योगही धोक्यात आलेला आहे. एक हजार जिम बंद पडल्या असून, अनेक जिम बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिमसाठी पहाटे पाच ते रात्री आठ या वेळात व्यवसायाची मुभा मिळावी. सध्या ज्यांना जिमचे नव्याने मेंबर व्हायचे असेल त्यांना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे असे संभाव्य मेंबर जिमपर्यंत येतच नाहीत. त्यामुळे ही अट काढून जिम व्यवसायाला दिलासा द्यावा. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली असून जिम ही आता गरज बनली आहे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.