पुणे: दोन नगरसेवक असणारे मनसेचे वसंत मोरे म्हणतात किंमत दाखवा

पुणे, ८ जुलै २०२२: पुणे महापालिकेत मनसेचे इन मीन दोन नगरसेवक आहेत. मात्र आता मनसेच्या माजी शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणतात किंमत असेल तर जनतेतून महापौर निवडा, पुढचा महापौर मनसेचा असेल. त्यामुळे मोरे यांच्या दाव्यात किती दम आहे ते आगामी महापालिका निवडणुकीत मनसे चे नगरसेवक किती निवडून येतात यावरून स्पष्ट होईल.

राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने लोकांमधून थेट सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड करणे बाबत निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण महापौर मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे.
“सरकार बदलले,

असे ऐकतोय प्रभाग रचना ही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकां मधून निवडुन देणार…

माझे सरकारला एक आव्हान आहे हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा…

आजच सांगतो किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल…”
असे या पोस्टमध्ये मोरे यांनी नमूद केलेले आहे. 2012 मध्ये मनसेचे 29 नगरसेवक पुणेकरांनी निवडून दिले होते पण हे नगरसेवक विशेष कामगिरी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे 2017 मध्ये यांची संख्या थेट दोन वर आली. यामध्ये वसंत मोरे आणि विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबा दोघांचा समावेश आहे। 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढावी म्हणून संघटना मजबूत केली जात आहे. मात्र राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले. वसंत मोरे यांनी ठाकरे विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोरे मनसे सोबत राहणार की अन्य पक्षात जाणार अशी चर्चा सुरू आहे.

सतत काही तरी फेसबुक पोस्ट टाकून चर्चेत असणारे मोरे यांनी जनतेतून महापौर निवडा असे सांगत पुन्हा चर्चेत आले. आहेत महापौर जनतेतून निवडला तरी मनसेचे नगरसेवक एक अंकित असणार की दोन अंकी होणार याकडे लक्ष लागलेले आहे त्यावरूनच कोणामध्ये किती दम आहे हे देखील निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.