पुणे, ०४/०४/२०२३: येरवडा कारागृहातील बराकीतील स्वच्छतागृहात मोबाइल ठेवल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कारागृह प्रशासनाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय ३८,रा. कारागृह वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवडा कारागृहातील बराकी आणि परिसराची नियमित तपासणी केली जाते. सोमवारी सायंकाळी कारागृहातील अधिकारी भिरु खळबुटे, अतुल तोवर कारागृहातील सर्कल क्रमांक एक आणि बराक क्रमांक तीनमधील स्वच्छतागृहाची तपासणी करत होते. त्यावेळी स्वच्छतागृहातील पत्रा वाकल्याचे आढळून आले. पत्रा उचकटून पाहिले असता तेथे मोबाइल ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. मोबाइलमध्ये सीमकार्ड नसून बॅटरीचे चार्जिंग करण्यात आले नव्हते.
कारागृहाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाईसाठी त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाइलचा वापर कोणी केला तसेच कारागृहात मोबाइल पोहोचला कसा, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत .
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार