पुणे: दागिन्यांवर डल्ला मारणारी मोलकरण अटकेत, कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. १८/११/२०२२: घरकामाच्या बहाण्याने बंगल्यातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ६५ हजारांचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही चोरी १० नोव्हेंबरला कोरेगाव पार्कमधील लेन सहामध्ये घडली होती.

उज्वला बचुटे (रा. फुरसुंगी मुळगाव -बार्शी जि.सोलापुर) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी हुकूमचंद कोटेचा यांनी तक्रार दिली आहे.

कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक सहामध्ये कोटेचा कुटूंबिय राहायला आहेत. त्यांनी उज्वला बचुटे हिला घरकामासाठी ठेवले होते. १० नोव्हेंबरला हुकुमचंद यांच्या पत्नीला देवघरातील चांदीच्या मुर्ती दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मोलकरीण उज्वलाबाबत संशय आला. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास करीत असताना एपीआय दत्तात्रय लिगाडे, नाईक विवेक जाधव, प्रविण पडवळ यांना एक महिला बंगल्याची पाहणी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून उज्वलाला ताब्यात घेतले.चौकशीत तिने चोरीची कबुली दिली.

ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक दिपाली भुजबळ, एपीआय दत्तात्रय लिगाडे, नामदेव खिलारे, रमजान शेख, विजय सावंत, विवेक जाधव, प्रविण पडवळ, ज्योती राऊत, वैशाली माकर यांनी केली.