पुणे, १९/१२/२०२२ – प्रवेशद्वारावर काढलेली सुंदर रांगोळी आणि ढोल ताशाच्या स्वागताने भरवलेले पर्यटक, महाराष्ट्रातील कलेचा वारसा वासुदेव, सोंगाडी, पोवाडे म्हणणारे शाहीर, जात्यावर दळण दळणाऱ्या ग्रामीण महिला, ग्रामीण संस्कृती, भजन, कीर्तन, मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहत ६००० हजारहून अधिक पर्यटकांनी वारसा स्थळांचा इतिहास समजून घेतला.
बालग्राम या संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ल्यादरम्यान हेरिटेज वाकचे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकमध्ये सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, कला, चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी व नागरिकांनी वॉकमध्ये सहभाग घेतला. हेरिटेज वॉकला सकाळी भाजे लेणीच्या पायथ्याजवळून हिरवा झेंडा दाखवून सुरूवात झाली. भाजे आणि लोहगड ग्रामपंचायती आणि आसपासच्या गावांमधील सुमारे ४५० स्थानिक नागरिक, ‘संपर्क’चे कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी संपर्कचे अमितकुमार बॅनर्जी, लोलिता बॅनर्जी, तुषार महाराज दळवी, अजय अरगडे, आदी उपस्थित होते.
मावळ पंचायत समिती, लोणावळा नगरपरिषद, भाजे लोहगड ग्रामपंचायतीसह परिसरातील ग्रामपंचाती, विविध कंपन्या, सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालये, भारतीय भूगर्भशास संस्था यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.
आंध्रप्रदेशातील वाघ नृत्य, पंजाबी भांगडा, राजस्थानी पारंपारिक नृत्य, जागरण गोंधळ असे संस्कृतिक कार्यक्रम पाहत पर्यटकांनी फळे, उकडलेले मक्याचे कणीस, भाजलेले शेंगदाणे, वडापाव, चहा व सरते शेवटी वांग्याचे भरित, ठेचा व पिठंल भाकरीचा मराठमोळा मेजवानावर ताव मारला.
मावळ तालुक्यातील भाजे लेणी, कार्ला लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला व विसापूर किल्ला या पुरातन व ऐतिहासिक भागाचा पर्यटनात्मकदृष्ट्या विकास व्हावा या करिता भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालग्राम या अनाथाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून हेरिटेज वॉक ही नावीन्यपूर्ण संकल्पना समाजासमोर ठेवली आहे. अतिशय प्राचीन 2 जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी कार्ला, भाजे व बेडसे लेणी सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले लोहगड व विसापूर या किल्ल्यांचा पर्यटनात्मकदृष्टया विकास झाल्यास आजूबाजूच्या ग्रामीण भागासह मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. प्राचीन वास्तूंचे रक्षण, त्यांची स्वच्छता, संस्कृती आणि इतिहासाची आठवण लोकांमध्ये नेहमी जागृत राहावी तसेच परिसरातील दुर्लक्षित, आदिवासी, अनाथ, गरीब विद्यार्थाना सरंक्षण देणे त्यांना मदत करण्याची लोकांना जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने संपर्क संस्थेच्या वतीने हेरीटेज वॉक सुरू केला.
More Stories
यंदाचा इंद्रायणी थडी महोत्सव तीर्थरुप आईस समर्पित
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला सुट्टी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कौशल्य विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये १ लाईटहाउस लवकरच सुरु करण्यात येणार आहे – महापालिका आयुक्त शेखर सिंह