पुणे, १२ जुलै २०२५: “संकटाच्या काळात जो संयमाने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करतो तोच खरा नेता असतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना व्यक्त केले. मोहोळ यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या “२४ तास जनसंपर्क कार्यालय” व कार्य अहवालाचे प्रकाशन सोहळा आज बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.
कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, धीरज घाटे यांच्यासह अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी केलेले कार्य देशपातळीवर चर्चेत आले. संकटातील नियोजन, संयम आणि सततचा पाठपुरावा यामुळे त्यांच्या नेतृत्वाची नवी ओळख निर्माण झाली आहे. देशातील कोणत्याही खासदाराचे नागरिकांसाठी २४/७ कार्यालय मी पाहिलेले नाही. ते देशभर फिरून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडतात.”
पुणे-मुंबई ‘मिसिंग लिंक’ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ फडणवीस यांनी पुढे सांगितले की, पुणे-मुंबई दरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासात अर्ध्या तासाची बचत होणार आहे. देशातील सर्वात लांब बोगदा (९ किमी) व सर्वात उंच पूल या मार्गावर निर्माण होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असून, पुण्यातील दुसऱ्या विमानतळासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे नवीन इको-सिस्टिम विकसित होणार आहे.
जागतिक वारसा स्थळात शिवकालीन किल्ल्यांचा समावेश “पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात राज्यातील १२ शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. यामुळे मराठ्यांचा इतिहास जागतिक व्यासपीठावर पोहोचेल,” असेही फडणवीस म्हणाले.
‘मोहोळ’ हा विश्वासाचा ब्रँड कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहोळ यांचा ‘मुरली ते अण्णा’ हा प्रवास अभूतपूर्व असल्याचे सांगितले. “ते प्रथमच खासदार झाले आणि थेट मंत्रीही. त्यांच्या यशामागे प्रामाणिक काम, कौटुंबिक पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे,” असे ते म्हणाले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मोहोळ यांच्या कामाचा गौरव करताना सांगितले, “त्यांनी कोरोनाकाळात केलेले कार्य आणि आता सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी मोलाचे ठरेल. ते खऱ्या अर्थाने लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहेत.”
कार्य अहवाल, ‘प्रथम माणूस’ पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात मोहोळ यांच्या कार्याचा वर्षपूर्ती अहवाल सादर करण्यात आला. तसेच कोरोनाकाळातील अनुभव कथन करणारे ‘प्रथम माणूस’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मोहोळ म्हणाले, “पुणेकरांनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. २४ तास सुरू असलेले कार्यालय ही पुण्याची लोकशाहीतील नवी ओळख आहे. माझ्या कामाचे प्राधान्य हे नेहमी लोकांच्या अडचणी सोडवणे व पुण्याला विकसित शहर म्हणून पुढे नेणे हेच राहील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.

More Stories
निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ
पुणे ः अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त