पुणे: “एमपीएससी’च्या विद्यार्थ्याची नोकरी नसल्याच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, ३ जुलै २0२१: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) दुपारी साडेचार वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली.

स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांच्या पत्नी असे दोघेजण संबंधित व्यवसाय पाहतात. तर स्वप्नीलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडीलांना खबर दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले.

स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून “एमपीएससी’च्या परिक्षेची तयारी करीत होता. तो “एमपीएससी’च्या २०१८ च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.