नूतनीकरणानंतर एमटीडीसी’चे सिंहगड येथील पर्यटक निवास पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल

पुणे, १८ जून २०२१: सिंहगडावर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) उभारण्यात आलेल्या पर्यटक निवास अत्याधुनिक सोयी-सुविधांसह पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले आहे. महामंडळातर्फे मंगळवारी (दि.१८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात या पर्यटक निवासाचे लोकार्पण करण्यात आले.

ऐतिहासिक महत्व असलेल्या सिंहगडावर पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी एमटीडीसीने पूर्वी बांधलेल्या पर्यटक निवासाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या पर्यटक निवासामध्ये 2 लोकनिवासांसहीत 3 खोल्या आणि उपहारगृहाची सोय करण्यात आली आहे. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ॲम्पीथिएटरही आहे. सदरच्या ठिकाणी विविध ग्रुपकडुन मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन आगामी काळात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे निर्जंतुकीरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली असून, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.