पुणे: मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा ‘जायका’कडून निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे, २१/०२/२०२२: शहरातील मुळा-मुठा या दोन्ही नद्यांच्या संवर्धनाचा मार्ग आता मोकळा झाला असून जायकाच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून साकारत असलेल्या प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेला ‘जायका’ने मान्यता दिली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. निविदा प्रक्रियेवर जायकाकडून शिक्कामोर्तब झाल्याने आता या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचेही महापौर मोहोळ म्हणाले.

 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत होत असलेल्या मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या कामाच्या (जायका) निविदा प्रक्रियेची अंतिम मान्यता बाकी असल्याने ही प्रक्रिया थांबलेली होती. आता मात्र जायकाने निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्याने आता स्थायी समितीतही या प्रकल्पाला मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पात शहराच्या मुळा आणि मुठा काठच्या परिसरात एकूण ११ सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या सांडपाणी पूर्णपणे शुद्ध करुन नदीत सोडले जाणार आहे. यात ५५ किमी लांबीच्या मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन्स केल्या जात आहेत. यामुळे गेली अनेक वर्षे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नद्या स्वच्छ पाण्याने वाहणार आहेत.

 

 

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष पुणे महापालिकेत २०१७ साली सत्तेवर येताना दोन्ही नद्यांना पुन्हा जिवंत करण्याचे वचन पुणेकरांना दिले होते. ते वचन आता पूर्णत्वास जाण्यास सुरुवात होत आहे. ही समस्त पुणेकरांसाठी नाही तर पुण्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी मोठी समाधानाची बाब आहे. यासाठी निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या हे खरे असले तरी आता सर्व अडचणी दूर करत महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे’.

 

‘जायकाने शिक्कामोर्तब केल्याने नदीसुधार आणि नदीकाठ विकसन प्रकल्प सोबतच सुरू होणार असून मुळा-मुठेचे सौंदर्य खुलतनाच नद्या पर्यावरणपूरक वाहणार आहेत. या प्रकल्प मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, राज्य, केंद्रशासनाच्या सर्व विभागाचे महापौर या नात्याने आभार मानतो. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पात विशेष लक्ष घालून पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प मार्गी लागला आहे, त्यासाठी देवेंद्रजींचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद. तसेच तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावेकर, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, खासदार गिरिश बापट यांचाही पाठपुरावा वेळोवेळी महत्त्वाचा ठरला’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.