पुणे: शहर अनलॉक कारण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आदश जाहीर, रात्री १० नंतर संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन कायम

पुणे, १०/०६/२०२१: कोरोनाची दुसरी लाट साथ आटोक्यात येत असताना पुण्याचा समावेश दुसऱ्या स्तरातील शहरात झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी शिथिल करण्यात आला आहे. सोमवारपासून (ता.१४) अत्यावश्यक सेवेसह सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सात पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर हॉटेल रात्री १० पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. रात्री १० नंतर शहरात संचारबंदी सुरू होईल. अभ्यासिका, कोचिंग क्लासेस, मॉल सुरू करण्यास परवानगी दिली असून, त्यासाठी क्षमतेच्या ५० टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (शुक्रवारी) हे आदेश काढले आहेत. हे आदेश पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोमेंट बोर्डास देखील लागू आहेत.

शहरातील कोरोना बाधितांचा दर ४.९५ टक्के इतका आहे. तर आॅक्सिजन बेड वापराचे प्रमाण २३.३३ टक्के इतके कमी झाले आहे. कोरोना बाधितांचे प्रमाण ५ टक्के व आॅक्सिजन बेडचे प्रमाण २५ टक्केच्या खाली आल्याने राज्य सरकारच्या निकषानुसार पुण्याचा समावेश दुसऱ्या स्तरामध्ये झाल्याने शहरातील निर्बंध कमी केले आहेत. गेल्या आठवड्यात पुणे शहर तिसऱ्या स्तरात असल्याने दुकाने बंद करण्याची वेळ दुपारी चार होती, तर हॉटेल देखील चार पर्यंतच खुली राहत होती. तर शहरातील मॉल, कोचिंग क्लासेस बंद होती. पण आता या नव्या नियमामुळे सर्व प्रकराची दुकाने सायंकाळी सात पर्यंत खुली राहू शकणार आहेत. हॉटेलही रात्री १० पर्यंत सुरू राहणार असल्याने व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.

असे आहेत नवे नियम

– अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात पर्यंत खुली राहतील.

 – अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात पर्यत खुली असतील

– अभ्यासिका, ग्रंथालय ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

– सार्वजनिक वाचनालये सुरू होणार

– कोचिंग क्लासेस प्रशिक्षण संस्था आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

– मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

– व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, क्षमतेच्या ५० टक्के आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार

– मद्यविक्री आठवडाभर सुरू

– कृषी संबंधित दुकाने, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतमाल विक्री सुरू राहणार

 – चित्रपटगृहे व नाट्यगृहे अद्यापही सुरू करण्याच मान्यता देण्यात आलेली नाही.

– रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री १० पर्यंत आसनक्षमतेच्या ५० टक्केने सुरू होणार

– महापालिकेची उद्याने,खुली मैदाने, चालणे, सायकलींग आठवड्याचे सर्व दिवस पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ सुरू खुले असणार

– खासगी कार्यालय कामाच्या दिवसी ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार

– आऊटडोअर खेळ आठवड्याची सर्व दिवस सुरू राहतील

– इनडोअर खेळ सकाळी ५ ते ९ व दुपारी ५ ते ७ या वेळेत सुरू राहतील

– सामाजिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमासाठी ५० लोकांची मर्यादा

– लग्नासाठी हॉलच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती असणार

– अंत्यविधी, दशक्रियाविधी साठी २० लोकांची मर्यादा

– महापालिकेच्या सभा, बैठका, सहकारी संस्थांच्या मुख्यसभा ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येणार

– इ कॉमर्स सुरू राहणार

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरू

– उद्योग नियमितपणे सुरू राहतील