December 3, 2025

पुणे: पब-बारवर महापालिकेची नोटीस

पुणे, १६ सप्टेंबर २०२५ : कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा, खराडी, वडगाव शेरी आणि बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील अनेक पब, बार व रेस्टॉरंटस्‌नी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली आहे.

पब, बारच्या वाढत्या गर्दीमुळे चालकांनी मोकळी व सार्वजनिक जागा ताब्यात घेऊन शेड, बांधकामे केली होती. काही ठिकाणी इमारतींच्या छतावरही अनधिकृतपणे पब, बार सुरू करण्यात आले. यामुळे नियमांचे उल्लंघन होऊन स्थानिकांना त्रास होत असल्याचे प्रशासनाच्या पाहणीत निष्पन्न झाले.

संबंधितांना वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष झाल्याने कल्याणीनगरमधील १५१ आणि वडगाव शेरी व खराडीतील ४० आस्थापनांना आतापर्यंत नोटीस देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.

दरम्यान, पब-बारवरील नियमभंगाच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका, पोलिस व जिल्हाधिकारी प्रशासनाची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही घोषणा केली असून, दर पंधरवड्याला आढावा घेऊन अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे.