October 26, 2025

पुणे: महापालिकेचा जीबीएस रुग्णांना आर्थिक दिलासा

पुणे, २७ जानेवारी २०२५: ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबीएसच्या रुग्णांसाठी महापालिकेने काहीसा दिलासा दिला आहे. जीबीएसवर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. तर रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील ‘जीबीएस’च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिताचा आढावा घेतला. त्यावेळी पुण्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने महापालिकेने पुणेकरांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना मोहोळ यांनी आयुक्तांना केली. त्यानुसार आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

यानुसार ‘‘जीबीएस’वर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मदत केली जाईल. तर खासगी अथवा कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘पुण्यात ’जीबीएस’चे रुग्ण आढळत आहेत. त्यासंदर्भात पालिका खबरदारी घेत आहे. परंतु यावरील उपचार महाग आहेत. त्यामुळे महापालिकेने पुणेकरांना उपचारांसाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली होती. त्यांनी त्यानुसार आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना नक्कीच दिलासा मिळेल,’असे मोहोळ यांनी सांगितले.