October 8, 2025

Pune: अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेची झडती; प्रती बोर्ड Rs १००० दंड, थेट गुन्हा दाखल

पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ : शहरात परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हा दाखल केला जाणार असून, प्रत्येक बोर्ड किंवा फ्लेक्सवर ₹१००० दंड आकारला जाणार आहे. तसेच कारवाईचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि शहराचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे महापालिकेने या विरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. परवानगीशिवाय फ्लेक्स किंवा बॅनर छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकांनाही पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले असून, नियमभंग झाल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार आहे.

शहरातील प्रत्येक क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स हटविण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. कुठेही अनधिकृत जाहिरात आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच जबाबदारी निश्चित केली जाणार आहे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.