पुणे महापालिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे, 07/05/2021: पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांयमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका महापौर मोहोळ यांनी घेतली आहे.

पुण्यात कडक लॉकडाऊन लावण्याच्या सूचना मा. उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी ही भूमिका मांडली आहे.

यावेळी मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १६ हजारांनी कमी झाली आहे. तर मृत्यूदरदेखील तुलनेने खाली आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात ७ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत’.

‘पुणे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने, अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र त्याच दरम्यान पुण्यात १ लाख आणि मुंबईत ५३ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचे पुढे आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, असे मला वाटते. पुणे शहरात जवळपास ३९ हजार सक्रीय रुग्ण आहे. हीच संख्या १५ दिवसांपूर्वी ५५ हजारांच्या पुढे होती. ही संख्या निर्बंध आणि उपाययोजना यामुळेच आटोक्यात आली आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखविण्यात आली असावी’, असेही महापौर म्हणाले.

‘पुणे शहराची परिस्थिती नियंत्रणात असून आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. तसेच कालपासून पुन्हा कडक लॉक डाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने, आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू आणि सध्या शहरात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामुळे आणखी लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

दोन आठवड्यात बदलले पुण्यातील चित्र : महापौर

कोरोना स्थितीबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयात आपण पुणे शहराची कोरोना संसर्गाची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत. पुणे शहरात १८ एप्रिल, २०२१ रोजी एक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ०३६ इतकी होती, जी ६ मेपर्यंत ३९ हजार ५८२ पर्यंत खाली आली आहे. याचाच अर्थ एक्टिव्ह रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार ०५४ इतकी घट झाली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.