म्युकरमायकोसिस’चा वाढता धोका पुणे महानगरपालिका राबविणार शोध मोहीम

पुणे,२६ मे २०२१: राज्यात पुणे शहराला म्युकरमायकोसिसचा सर्वात जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. पुण्यात आतापर्यंत ६२० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ५६४ रूग्ण या आजारावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात सध्या पुणे काळ्या म्युकरमायकोसिसचे केंद्रबिंदू ठरत आहे. पुण्यानंतर नागपूर शहर म्युकरमायकोसिसशी सामना करणारे राज्यातील दुसरे शहर ठरत आहे. म्युकरमायकोसिसचा धोका पुण्यात झपाट्याने वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत २९ जण म्युकरमायकोसिसच्या आजारातून बरे झाले आहेत. तर २७जणांचा म्युकरमायकोसिसच्या आजाराने जीव घेतला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. पण अनेकांना त्याची लक्षणे त्वरित लक्षात येत नसल्याने उपचारास उशीर होत आहे. असे रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

१ एप्रिलपासून कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांना महापालिकेकडून फोन करून, त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची कोणती लक्षणे आहेत का? याची विचारणा केली जात आहे.. या आजारासंबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांना, महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचा वाढता धोका ओळखून आता १ जूनपासून कोरोनामुक्त नागरिकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

“म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी ससून व दळवी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन खरेदीसाठी स्थायी समितीच्या मार्फत टेंडर काढले जात आहे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही या इंजेक्शन पुरवठ्याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.” – विक्रम कुमार, आयुक्त, पुणे मनपा