December 2, 2025

पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री

पुणे, १३ ऑक्टोबर २०२५: महापालिका हद्दीतील बचत गटातील महिला, विविध सामाजिक संस्था तसेच दिव्यांग लाभार्थ्यांचे स्टॉल लावले असून, प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत (११ आणि १२ ऑक्टोबर) एकूण विक्री १९ लाख इतकी झाली आहे. शहरातील नागरिकांनी बचत बाजार प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी केले आहे.

पालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाज विकास विभागामार्फत बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांना सक्षम बनवून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम ११ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी १० वाजेपर्यंत आहे. शहरात नवीन भाजी मंडई वडगाव शेरी, पु.ल देशपांडे उद्यान. मेंगडे तलाव कर्वेनगर, कात्रज दुध डेअरी मैदान, जीत मैदान कोथरूड, तसेच झेन्साॅर आयटी पार्क खराडी या सहा ठिकाणी ७९३ स्टाॅल उपलब्ध केले आहेत.

प्रदर्शनामध्ये चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, शेव, अनारसे आदी फराळाच्या पदार्थांबरोबर पणत्या, रांगोळी, दीपपाळा, आकाशकंदीलांचाही समावेश आहे. याशिवाय विविध खाद्यपदार्थ जले की, वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेय, सोलकढी, लोणची, पापड, मसाले, तयार पिठे, शेवया, कुरड्या, बिर्याणी असे शाकाहारी, मांसाहारी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरगुती वापरातील स्वेटर्स, तयार कपडे, तोरण, आयुर्वेदिक उत्पादने, कागदी व कापडी पिशव्या, लेदर पिशव्या, फाईल्स, पेपर प्रॉडक्टस्, ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती इत्यादी विविध वस्तूंचाही बाजारत समावेश आहे.