पुणे महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम; लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध

पुणे , २७ मे २०२१: पुणे शहरातील अनेक रूग्णालयात लसीकरण सध्या सुरू आहे. मात्र अनाथ आश्रम, एचआयव्ही बाधित यासह मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम राबविला जात असून त्या अंतर्गत ५ ‘मोबाईल व्हॅन’चे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घरी जाऊन थेट लसीकरण करण्यात येणार आहे. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाकरिता ५ मोबाईल व्हॅन पहिल्या टप्प्यात सेवेसाठी असणार आहेत.

पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार्‍या ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन’ उपक्रमाचे आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख आशिष भारती उपस्थित होते. व्हॅक्सीन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन उपक्रमाला सीएसआरअंतर्गत जिव्हीका हेल्थकेअर प्रा. लि आणि माय व्हॅक्सीन या दोन्ही संस्थेचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांच्या मार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘केंद्र सरकाराच्या आदेशानुसार पुणे शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपाय योजना करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल पुणेकरांचे मी आभार मानतो, त्याच बरोबर आपल्या शहराला अधिकाधिक लस कशा मिळतील. यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे. त्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल आणि आपल पुणे शहर 100 टक्के लसीकरणा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत आपण लसीकरण केंद्रावर येणार्‍या प्रत्येकाला लस देत होतोच, पण त्यामध्ये अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग, एचआयव्ही बाधित बालक, यासह मानसिक दृष्ट्या व्यक्ती जे घराबाहेर किंवा संस्थेच्या बाहेर पडू शकत नाही. अशा करिता आता व्हॅक्सीन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन उपक्रमा अंतर्गत थेट संबधित व्यक्ती जिथे असेल, तिथे लसीकरण केले जाणार आहे. या उपक्रमाचे आज उदघाटन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक व्यक्ती लाभ घेतली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चौकट
असा असेल ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन’ उपक्रम :

– शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध

–व्हॅनमध्ये १ डॉक्टर, २ परिचारिका, १ आरोग्य नोंदणी सहायक, १ आरोग्य समाजसेवक, १ चालक आणि एईएफआय किटसह १ रुग्णवाहिका असेल.