पुणे: महापालिकेच्या अधिकार्यांकडून शहराची पाहणी

पुणे, ता. १३/०९/२०२२ ः शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ५९ ठिकाणी पाणी साचले, ३८ ठिकाणी पाणी शिरले, १० झाडे पडली तर ११ ठिकाणी भिंती पडल्या. पाण्याचा निचरा न होण्यास अतिक्रमण, पावसाळी गटारीचा अभाव यामुळे नागरिकांकडून टीका होत असताना आता महापालिका प्रशासनाने तीन अतिरिक्त आयुक्तांना शहरातील या घटनांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

रविवारी (ता. १२) दुपारी पुणे शहर व उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अवघ्या काही मिनीटात सर्वच रस्ते जलमय झाले. सायंकाळी पाच ते रात्री आठ या तीन तासामध्ये शहरात सरासरी ६२.४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ८५.०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २२.६१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

पूर आल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे आणि विलास कानडे या तिन्ही अधिकाऱ्यांना शहरातील घटनास्थळांची पाहणी करून यावी, पाणी कशामुळे तुंबले, अतिक्रमण, नाले वळविणे, चेंबरचे काम व मदतकार्य याचा अहवाल आयुक्तांना दिला जाणार आहे.

दरम्यान, रविवारी पाऊस झाला तेव्हा महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय नव्हता. त्याचा फटका शहराला बसला. पण आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या निवेदनात अग्निशामक दल, मोटर वाहन विभाग, विद्युत विभाग, मलनिःसारण विभाग, उद्यान विभाग, पथ विभाग, बांधकाम विभागाने प्रतिसाद दिला. तसेच युटिलिटी व्हॅन, जेटींग मशिन, जेसीबी, ट्रक अशी यंत्रणा मनुष्यबळासह उपलब्ध करून दिली. सर्व विभागात समन्वय ठेवून तक्रारींचे निरसन केल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे.

 

मदतीसाठी या ठिकाणी संपर्क साधा

आपत्ती व्यवस्थापन कक्ष – ०२०-२५५०६८००/१/२/३/४

अग्नीशामक दल – १०१ किंवा ०२०-२६४५१७०७