November 5, 2025

Pune: मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी, गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख

मुबारक अन्सारी
पुणे, ०५/११/२०२५: भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी (जिल्हा प्रमुख)  म्हणून तर  माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

मोहोळ यांनी पूर्वी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून कार्यभार सांभाळला आहे तर बीडकर यांनी यापूर्वी नगरसेवक, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात बीडकर यांच्याकडे पुणे शहराच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल,असे मोहोळ म्हणाले. पक्षनेतृत्वाने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले.

 ‘ राज्यात भाजप व महायुतीला अनुकूल वातावरण आहे. पुणे महापालिकेत २०१७-२२ या काळात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहराच्या भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप व महायुतीच्याच पाठीशी राहतील, याची मला खात्री आहे. शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे. २०१७ च्या निवडणुकीतही निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळेप्रमाणेच यंदाही भाजप, महायुती सत्तेवर येईल,’असा विश्वास बीडकर यांनी व्यक्त केला.