पुणे : साथीदारांच्या मदतीने अल्पवयीनीचा खुन केल्याचे उघड; दत्तवाडी पोलिसांकडून सहा जणांना अटक

पुणे, 14 जून 2021 : भाच्याचा खून केल्याचा राग मनामध्ये धरून मामाने साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी (दि.13) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पर्वती पायथा येथे झालेल्या खूनाची उकल करण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले आहे.
सौरभ विनोद वीर ऊर्फ मोन्या, अक्षय विनोद वीर, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन ऊर्फ दादा पवार, आकाश नावाडे, स्वामी कांबळे असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ वाघमारे (रा. जनता वसाहत) असे खुन झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय 23, रा. हडपसर) याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ वाघमारे याने एप्रिल महिन्यात आंबेगाव पठार येथे आरोपी वृषभ रेणुसे याचा भाचा संग्राम लेकावळेचा खुन केला होता.
त्याचा राग मनात धरुन आरोपींनी सौरभला मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी काल रात्री सौरभला जुना मोबाईल देण्याचा बहाणा करून पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. सौरभसोबत त्याचा मित्र दादासो बनसोडे होता. त्यावेळी आरोपी सौरभ वीर, अक्षय वीर व वृषभ यांनी सौरभ वाघमारेला शिवीगाळ करून कोयत्याने डोक्‍यात, पाठीवर व हातावर वार केले. सचिन पवार, आकाश नावाडे व त्यांच्या इतर साथीदारांनी सौरभला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सौरभचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान, सौरभच्या मदतीला स्थानिक नागरीकांनी येऊ नये, यासाठी आरोपी नागरीकांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी नागरीकांना “इथून निघून जा, नाहीतर तुम्हालाही मारुन टाकू’ अशी धमकी देत आरडाओरडा केला. दरम्यान, फिर्यादी दादासो बनसोडे आरोपींना “सौरभला मारू नका, तो मरेल’ असे ओरडत होता. त्यावेळी आरोपींकडून झालेल्या मारहाणीत बनसोडे गंभीर जखमी झाला.