‘पे ॲण्ड पार्क’ म्हणजे नागरीकांकडून खंडणी वसूलीचा प्रकार, विशाल वाकडकर राष्ट्रवादी युवकचे मनपा भवनाच्या दारात आंदोलन

पिंपरी, दि. 02 जुलै 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोनाच्या काळात गोरगरीब नागरीकांना, कामगारांना आर्थिक मदत देणे आवश्यक असताना ‘पे ॲण्ड पार्क’ ची अंमलबजावणी करणे म्हणजे सर्वसामान्य नागरीकांकडून खंडणी वसूलीचाच प्रकार आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.

भाजपाच्या दबावाखाली येऊन पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने शहरातील तेरा मुख्य रस्ते, उड्डाणपुलांच्या खालील जागा अश्या एकूण 450 ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना एक जुलै पासून ‘पे ॲण्ड पार्क’ लागू केले आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि ‘पे ॲण्ड पार्क’ चा आदेश मनपाने मागे घ्यावा या मागणीसाठी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 2 जुलै) मनपा भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, नगरसेविका सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर, निकीता कदम, युवक प्रदेश पदाधिकारी विशाल काळभोर, लाला चिंचवडे, योगेश गवळी, कुणाल थोपटे, शेखर पाटील, किरण देशमुख, माधव पाटील तसेच कविता खराडे, संगिता पवार, शाम जगताप, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप आदींसह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनपातील भाजपाच्या सत्तेविरोधात जोरदार घोषणा दिल्या. अजित गव्हाणे, विजय लोखंडे, प्रशांत शितोळे, संजोग वाघेरे पाटील, विलास लांडे यांनीही प्रशासन व शहर भाजपाच्या कार्यप्रणालीवर कडक टिका केली.

विशाल वाकडकर म्हणाले की, केंद्र सरकारने मागील सहा वर्षात जीएसटी, नोटाबंदी असे तुघलकी निर्णय घेतले. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर आर्थिक संकट आले आहे. त्यात मार्च 2020 पासून कोरोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे लाखो नागरीकांचा रोजगार गेला आहे. शहरातील युवकांच्या हाताला काम नाही. उद्योजक, व्यापारी सर्वच आर्थिक अडचणीत आहेत. नागरीकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. अशा वेळी हवालदिल झालेल्या कष्टकरी, गोरगरीब कामगारांना, सर्वसामान्य नागरीकांना मदतीचा हात देऊन दिलासा देणे अपेक्षित होते. मदत करण्याऐवजी पिंपरी चिंचवड मधिल भाजपाच्या भ्रष्टाचारी प्रशासनाने सर्व सामान्यांच्या खिश्यावर डल्ला मारला आहे. पे ॲण्ड पार्कचा आदेश ताबडतोब प्रशासनाने मागे घ्यावा अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी यावेळी केली.