पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन

पुणे, 9/2/2022: पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून राज्यातील कानाकोपऱ्यात नरेंद्र मोदींचा निषेध केला जात आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमिचा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या मनात कायमच द्वेष राहिला आहे. त्यामुळेच ते या भूमिचा कायमच अपमान करीत आले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी दिपाली धुमाळ, प्रवक्ते देशमुख सौ. मृणालिनीताई वाणी,  किशोर कांबळे, शशिकलाताई कुंभार, कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .